जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन या दोघांना घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावर शनिवारी धुळे सत्र न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली. देवकरांना ५ वर्षांची तर सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच प्रमाणे त्यांना १०० कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
दोघांनी केलेला गुन्हा गंभीर असल्याने त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा सुद्धा तेवढ्याच सक्षम स्वरूपाची आहे. मात्र या शिक्षेमुळे दोन्ही नेते आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास अपात्र झाले आहेत. कारण १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यामधील कलम ८ (३) नुसार एकाद्या व्यक्तीला देशातील कोणत्याही न्यायालयाने २ वर्षापेक्षा अधिक काळाची शिक्षा सुनावली असेल तर तो व्यक्ती कोणत्याही निवडणुकीला पात्र राहत नाही. तसेच त्याला आपली शिक्षा भोगल्या नंतर ६ वर्षांच्या कालावधी पर्यंत कोणतीच निवडणूक लढता येत नाही.
गुलाबराव देवकर राष्ट्रवादीचे नेते असले तरी सुद्धा ते भाजपमधून आगामी विधानसभा निवडणूक लढायला इच्छुक होते. मागील काही दिवसापूर्वी त्यांनी गिरीश महाजन यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतरच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाना जोर आला होता. मात्र या दरम्यानच न्यायालयाचा निकाल आल्याने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.