4 दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडले असे काही…

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणचे अल्पवयीन प्रेमीयुगल मागच्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. याची तक्रार मुलीच्या वडिलांनी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये केली होती. यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन प्रेमीयुगलाला शोधून काढले आणि बदनापूर या ठिकाणी आणले. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

काय आहे प्रकरण
बदनापूर पोलिसांनी या बेपत्ता प्रेमीयुगलाला कल्याण रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. कल्याण येथून बदनापूर पोलिसांनी या प्रेमीयुगलास काल बदनापूर या ठिकाणी आणले. यानंतर मुलीच्या जबाबावरून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर प्रियकराला न्यायालयात हजर करण्यात आले. हा प्रियकर अल्पवयीन असल्यामुळे त्याला काल रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जालन्यातील शासकीय बालसुधारगृहात दाखल करण्याची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना त्याने लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून शौचालयात टॉयलेट क्लिनर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हे समजताच त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयातून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. आता त्या प्रियकराची प्रकृती सुधारली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे.

You might also like