सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्हा भाजप जिल्हाध्यक्षपदी नुकतीच आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून गोरे यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात अस्थिरतेचे वातावरण असून सरकार टिकवणे एवढंच काम महाविकास आघाडीचे आहे शेतकऱ्यांचा राजा ज्याला संबोधले जाते त्या राजाला, नेत्याला जर शेतकऱ्यांचे नुकसान कळत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही,” अशी टीका गोरे यांनी केली.
मुंबईत येथे आमदार जयकुमार गोरे यांना निवडीचे पत्र दिल्यानंतर आमदार गोरे यांनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गोरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सामान्य लोकांचे काम मात्र त्यांना दिसत नाही. शेतकऱ्यांची राख रांगोळी करण्याचे काम या सरकारने केले आहे. गेल्या 2 महिन्यापासून शेतकऱ्यांची वीज कापली जातेय. त्यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान हे शेतकऱ्यांच्या नेत्याला कळत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
मुंबई येथील अधिवेशन संपवून जिल्हाध्यक्ष साताऱ्यात दाखल होताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकत्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात भाजपचे संघटन करण्याची माझी तयारी आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार गोरे यांनी सांगितले.
लवकरच जिल्ह्यातील 75 टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल
आ. जयकुमार गोरे यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी गोरे यांनी आठवडाभरात सातारा जिल्ह्यात बदल झालेला दिसेल. लवकरच जिल्ह्यातील 75 टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या माढा मतदारसंघातून भाजपचा खासदार निवडून आणला. आता जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतून भाजपचे आमदार निवडून येऊ शकतात, असे म्हंटले.