महाराष्ट्र किती झुकलाय हे पाहायला मिळतंय; जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Jayant Patil Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीतील पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असल्याचा एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला विषय ठरला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. “औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले, दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभं राहावं लागत आहे. परिस्थिती किती बदलली आहे. महाराष्ट्रात किती झुकलाय हे आजच्या फोटोवरून पाहायला मिळत आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नीती आयोगातील बैठकीतील फोटोबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दिल्लीत बैठकीवेळी काढल्या जात असलेल्या फोटोवेळी तिथला प्रोटोकॉल अल्फाबेटिकली असतो. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे रांगेत मागे उभे राहिले असतील. मात्र, महाराष्ट्र किती झुकलाय हे यावरून पहायला मिळत आहे.

रोहित पवारांचं खोचक ट्वीट – 

दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीनंतर पंतप्रधानांसोबत आज इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोटो काढला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे शेवटच्या रांगेत उभे राहिल्याचे पहायला मिळाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत केंद्र सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. “एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!, असे पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटल.