हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा मुद्दा राज्याच्या राजकीय वर्तुळात तापू लागला आहे. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला टार्गेट केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातले सर्व प्रकल्प गुजरातला चाललेत. राज्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ढिम्म बसलेत. सध्या शिंदे-फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करण्याचं काम करत आहे,” अशी टीका करत पाटील यांनी हल्लाबोल केला.
जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात सुशिक्षित असलेल्या तरुणांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्यात आला असता तर किमान तीन-चार लाख रोजगार आला असता. टाटांना विमान तयार करण्याचा कारखाना तयार करायचे ठरविले. तीदेखील कंपनी बडोद्याला गेली. याचा अर्थ जाहीर आहे की या सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करायचं ठरवलं आहे.
वास्तविक महाराष्ट्राऐवजी गुजरातची सेवा करायला सरकार निर्माण करण्याचं कट-कारस्थान महाराष्ट्रात झालं आहे. सध्या महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला पळवून नेण्याचं काम सुरू आहे. अशात या सरकारचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे. त्यामुळे यांचं काहीही गुजरातपुढे चालत नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हतबल झाले आहेत. आता पानभर जाहिराती ७५ हजार नोकऱ्या देणार हे सांगायला देतात. त्याऐवजी फॉक्सकॉनच्या मालकाला भेटलात आणि त्याला इथे आणलं तर एका दिवशी साडेचार लाख नोकऱ्यांचा निर्णय होईल,असे जयंत पाटील यांनी म्हंटले.