घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी; आव्हाडांचा शीतल म्हात्रेंना सणसणीत टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यात सध्या ट्विट वॉर पाहायला मिळत आहे. शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंचा उर्दू भाषेतील बॅनर शेअर केल्यांनतर या वादाला सुरुवात झाली. अखेर मला जास्त बोलायला लावू नका, घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी असं सणसणीत प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी शीतल म्हात्रे यांना दिले.

नेमकं काय घडलं ?

25 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांचा मालेगाव येथील उर्दू भाषेतील बॅनर शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा? उध्वस्त सेना..खांग्रेसची चमचेगिरी”, असं ट्वीट शीतल म्हात्रेंनी केलं होतं. शीतल म्हात्रे यांच्या ट्विटला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमांत्री एकनाथ शिंदे यांचा उर्दू भाषेतील बॅनर ट्विट केला. त्यावर एकनाथ शिदेंसह अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे. याच्यावर बोला ताई. खास तुमच्या माहितीसाठी. कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे”, असं ट्वीट आव्हाडांनी केलं.

या ट्वीटला शीतल म्हात्रेंनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं. “मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्वीट चांगलंच झोंबलेलं दिसतंय. पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय”, असं ट्वीट शीतल म्हात्रेंनी केलं. त्यावर उत्तर देताना “मला काम करताना गवगवा करण्याची सवय नाही. लोकांसाठी कार्यक्रम करतो. माझ्या मतदारसंघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारं कृत्य मी करत नाही. आठवतंय ना? काय दे ढुं***, काय तो दांडा.. धूर कुठून निघाला?” असा खोचक सवाल आव्हाडांनी केला.

दरम्यान, यावर शीतल म्हात्रे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत “पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी.लगे रहो भाईजान”, अस उत्तर जितेंद्र आव्हाडांना दिले. त्यावर प्रत्युत्तर देताना त्याची चिंता आपल्याला नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी”, असं खोचक ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. शीतल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटर वॉरची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे.