कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही कळत नाही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai News : सोमवारपासून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीतच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  बंड केलेल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यानच सर्व आमदारांनी शरद पवारांची दिलगिरी व्यक्त करत त्यांचे आशीर्वाद घेतले.

गेल्या २ जुलै रोजी याच सर्व आमदार आणि मंत्र्यांना घेऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले होते. राष्ट्रवादी विरोधात बंड पुकारत त्यावेळी अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या निवृत्तीचे वय काढलं होतं. मात्र यावर संयम दाखवत शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या सर्व गोष्टींना पंधरा-सोळा दिवस उलटून गेल्यानंतर बंड केलेल्या सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी सूचक असे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी थेट अजित पवार आणि सर्व आमदारांवर खोचक टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाडांनी म्हटले आहे की, “पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज… शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी आणि राजकारणात संयमाला किती महत्व आहे हे कोणाकडून शिकावं; एकच नाव शरद पवार ! कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही कळत नाही. त्याला 10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली”

 

 

दरम्यान काल पुन्हा एकदा बंड केलेल्या आमदाराने मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी देखील हेच आमदार, मंत्री शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. आता पुन्हा झालेल्या त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच आता या आमदाराने मंत्र्यांना आपल्या चुकीची जाणीव झाल्यामुळे ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे येण्याचा विचार करत असल्याचे देखील तर्क लावले जात आहेत.