हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील लाल महालामध्ये एका चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर रील्सचं शूटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून संभाजी ब्रिगेडनं संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर लाला महालातील प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी ट्विटमधून “पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे. यापुढे हे होता कामा नये. कोणी केले असेल तर वापरू नका”, असे म्हंटले.
लाल महालातील प्रकारावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून त्यामधून त्यांनी लाल महालातील प्रक्राराबाबत संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने या प्रकरणाशी संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल हि वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे …ह्यापुढे होता कामा नाही.. कोणी केले असेल तर वापरू नका @PuneCityPolice
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 21, 2022
नेमकं काय आहे लाल महाल प्रकरण?
पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महालामध्ये एका तमाशाच्या गाण्यावर चित्रीकरण झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी मिळून हे चित्रीकरण केले. या गाण्याच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या आठवणींचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लाल महालामध्ये अशा गाण्यांचे चित्रीकरण होणे हा लाल महालाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली. यानंतर कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.