हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काल पोलिसांनी अटक केली. आव्हाडांवर कलम विविध कलमांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आज आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आले तेव्हा त्यांनी नातेवाईकांशी बोलताना गंभीर आरोप केला. “मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आहे. मला अटक व्हावी म्हणून पोलिसांना चाणक्यांचे वारंवार फोन येत होते, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी नातेवाईकांशी संवाद साधत पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. ते म्हणाले की, मी स्वत:हून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलो होतो. पण मला खोटं बोलवून अटक करण्यात आली. मला अटक व्हावी म्हणून पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला. पोलिसांना एका चाणक्याचे वारंवार फोन येत होते. मला अटक करण्यास सांगितलं जात होते. अटक करताना नियमांचे पालन केले गेले नाही.
दरम्यान, सध्या जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आव्हाड यांचे असलेले वकील प्रशांत कदम यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.