फक्त हे करा! माझ्यासाठी त्याच यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा- धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड । बीड जिल्ह्यासह राज्यावर कोरोना महामारीचे सावट असल्यानं कोणाही माझा वाढदिवस साजरा करू नये, असं भावनिक आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी हे आवाहन केलं आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि,”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका. बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर करोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत.”

‘तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी करोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच, कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी,’ असंही मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणाऱ्या धनंजय मुंडे यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. मुंबईत उपचार घेतल्यानंतर ते ठणठणीत झाले. मात्र, त्या काळात त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी नवससायास व उपासही केले होते. त्यावेळीही मुंडे यांनी कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं होतं.

‘त्या’ विजयनानंतर धनंजय मुंडेंचा पहिलाच वाढदिवस
मागील विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. त्यामुळं त्यांचं राजकीय वजन प्रचंड वाढलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतरचा त्यांचा हा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करण्याची किंवा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ट्विटरद्वारे आवाहन केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.