कराड पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; शिवेडेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे ता. कराड गावाच्या हद्दीत एस. के. पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्‍या टोळीला बुधवारी दुपारच्या सुमारास कराड शहर पोलिसांनी विद्यानगर येथून सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व पंपावरून लुटलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

विकी उर्फ मन्या नंदकुमार बनसोडे (वय 27, रा. होली फॅमिली स्कूलचे पाठीमागे, वैभव कॉलनी, विद्यानगर-कराड, मूळ रा. नरवणे, ता. माण), अनुभव सुरेंद्र मिश्रा (वय 19, मूळ रा. दिलेरगंज, ता. कुंडा, जि. प्रतापगड, राज्य उत्तरप्रदेश), सुमितसिंग मालसिंग सिंग (वय 36, मूळ रा. धनकमई, ता. खाघर, जि. फतेपूर), विरप्रतापसिंग महादेव सिंग (वय 25, मूळ रा. तंजपूर, ता. बिंदकी, जि. फतेपूर), शुभम मनोज सिंग (वय 18, मूळ रा. आखरी, ता. खागा, जि. फतेपूर), उमजा सुमितसिंग सिंग (वय 26, मूळ रा. धनकमई, ता. खाघर, जि. फतेपूर) अशी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रजनजीक शिवडे येथे एस. के. पेट्रोल पंपावर कट्ट्याचा धाक दाखवत सहा दरोडेखेरांनी पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने पंपावर येऊन तेथील कर्मचारी व मँनेजनला मारहाण करीत पंपावरील रोख रक्कम व दोन मोबाईल लंपास केले होते. यामध्ये सहा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मंगळवारी घटनास्थळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी भेट देऊन या गुन्ह्याचा छडा लवकर लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशाप्रमाणे पोलिसांच्या वेगवेगळ्या टीत तैनात करण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजवरून कराड शहर पोलिसांना कराडमधील एकजण या कटात सामील असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. सर्व दरोडेखोर विद्यानगर येथे राहत असलेल्या विकी बनसोडे याच्या घरात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विद्यानगर येथील विकी बनसोडेच्या घराच्या आजूबाजूला पोलिस बंदोबस्त तैनात करून सिनेस्टाईल पद्धतीने त्याच्या घरावर छापा टाकून सहा दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले गावठी कट्टा व लुटलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस हवालदार आनंदा जाधव, मारूती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, संग्राम पाटील, अनिल चव्हाण, रविंद्र देशमुख, सागर भोसले यांनी केली.

सिनेस्टाईल थरारक

शिवडे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे सहाही दरोडेखोर विद्यानगर येथे एका घरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरोडेखोर यांच्याकडे गावठी कट्टा असल्याने पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने विकी बनसोडेच्या घराच्या बाहेर जागोजागी पोलिस कर्मचारी तैनात करून त्यांना बुलेट प्रुफ जॅकेट व हातात बंदुका देऊन विकी बनसोडेच्या घरावर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.