हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबाद येथे सभा होत आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारीही केली जात आहे. त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून विरोधकांकडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री काय औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का? ही काय अवस्था झालीये शिवसेनेची? सरकारकडून जनतेचा जो पैसा वसुलीद्वारे आलाय, त्याचा उपयोग स्वत:च्याच आमदारांना विकत घेण्यासाठी माफिया सेना करतेय, अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजाराचा आरोप होत असल्याच्या कारणावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे की, स्वत:च्या आमदारांना स्वत:कडे ठेवण्यासाठी वसुलीच्या पैशांचा वापर केला जातोय.
ज्या ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रात दौरे करतो, अनेक लोकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करतो. तेव्हा लोक आम्हाला प्रश्न विचारतात की स्वत:च्या आमदारांना बिकाऊ म्हणणारा हा मुख्यमंत्री आहे काय? आमदारांना अँटिचेंबरमध्ये काय सांगत असतील, सौदेबाजी चालू असेल माहिती नाही. हे काय होत आहे ठाकरे साहेब? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी केला.