रऊफ मेमनसोबत फडणवीस- राज्यपालांचे फोटो; भाजपच्या बाउन्सरवर पेडणेकरांचा सिक्सर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन चा नातेवाईक रऊफ मेमनसोबत शिवसेना नेत्या किशोरी पेंडणेकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून भाजपने पेडणेकरांवर निशाणा साधला जात असतानाच आता किशोरी पेडणेकर यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे रऊफ मेमनसोबतचे फोटोच शेअर करत भाजपच्या बाउन्सर वर सिक्सर मारला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत. तर त्यांच्या दुसऱ्या ट्विट मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रऊफ मेमन सोबत दिसत आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेत आता फडणवीस आणि कोश्यारी यांच्या चौकशीचीही मागणी करणार का? असा प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना विचारलाय.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, महापौर असताना धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी गेले होते. बैठकीला कोण कोण उपस्थित होते, याची मला कल्पना नाही. आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र आखलं जात आहे, वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आमच्यावर आरोप करुन आमचं संयमी नेतृत्व कसं भडकेल, याची वाट भाजप पाहत आहे असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. मी कामाने मोठी झाले. मी नाही तुमच्यासारखे छक्के पंजे खेळले, माझ्या कामावर तुम्हाला आक्षेप असेल तर मला सांगा, बैठकीला कोण कोण होत मला नाही माहित पण वडाला पिंपळाची साल लावण्याचा हा प्रकार आहे”, असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.