युवक काँग्रेस निवडणूक : कुणाल राऊतांची उमेदवारी धोक्यात? भाजपच्या ‘त्या’ आरोपानंतर राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेणार

मुंबई | सध्या राज्यात युवक काँग्रेसची रणधुमाळी सुरू असून अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. त्याच दरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्यावरच गंभीर आरोप करत या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. कुणाल राऊत यांच्या विजयासाठी नितीन राऊत यांनी संपूर्ण महावितरण काँग्रेसच्या दावणीला बांधली असा आरोप भाजप युवा मार्चाने केला आहे.

नितीन राऊत यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांचा गैरवापर केला आहे. तसेच अधिकाऱ्यांना बैठका घ्यायला लावून कुणाल राऊत यांच्या मतनोंदनी बाबत सूचनाही केल्या असून आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राऊतांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी म्हंटल आहे. तसेच राहुल गांधींकडेही आपण तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, एकीकडे राहुल गांधी मात्र गोरगरीब घराण्यातील मुले उच्च पदावर यावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना त्यांच्याच पक्षात जर अशा प्रकारे घराणेशाही असलेल्या लोकांकडून अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ही चिंतेची बाब आहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांच्याकडेही राऊत याच्या पराक्रमाबाबतची तक्रार गेली आहे. राहुल राऊत यांची उमेदवारीही रद्द करु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कुणाल राऊतांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

तर दुसरीकडे, कुणाल राऊत यांनी मात्र एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करत भाजपचे हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. हे तर काँग्रेस आणि महाविकास आघाडी विरोधातील षडयंत्र आहे अशा शब्दांत कुणाल राऊत यांनी पलटवार केला आहे. राजकीय नैराश्यातून भाजप हे आरोप करत असल्याचे त्यांनी म्हंटल.

युवक काँग्रेसचे प्रणिल जांभुळे यांनीही यामध्ये कोणत्याही प्रकारे यंत्रणेचा गैरवापर करण्यात आलेला नाही असे स्पष्ट केले आहे. आज जर मंत्रिपदावर उभा असलेल्या व्यक्तीचा मुलगा निवडणूक लढत असेल तर यंत्रणा त्याच्यासाठी काम करत आहे हा पूर्णपणे चुकीचा आरोप आहे असे त्यांनी म्हंटल. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे युवक काँग्रेसच्या निवडणुकीला एक नवे वळण लागले आहे.