महिला दिन विशेष | प्रणव पाटील
सिरीया आणि इराकच्या उत्तरसीमेवर इसिस च्या जिहादी सैनिकांचा सामना जेव्हा कुर्दीश स्त्री लढवय्या गटाशी झाला तेव्हा त्यांची पळताभुई झाली होती….रंगाने गोर्या असणार्या, मध्यम बांध्याच्या, काटक आणि सुंदर डोळ्यांच्या, लांब सडक केस ठेवणार्या या मध्यआशियातील सुंदर स्त्रीया पाठीवर अत्याधुनिक रायफल लटकवून काडतूसांच्या माळा कंबरेभोवती गुंडाळून जेव्हा युध्दात उतरतात तेव्हा कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं असंच त्यांचं रुप असतं.
कोण आहेत या कुर्द समरणांगणा?चला पाहूया…
कुर्द ही लढावय्या जमात टर्की,इराण,इराक,सिरिया आणि आर्मेनियाच्या सीमा भागात डोंगराळ प्रदेशात राहणारी मेंढपाळी करणारी जमात आहे….आज त्यांची लोकसंख्या ही ३.५ कोटी च्या आसपास असून त्यांची सर्वाधिक लोकसंख्या ही टर्की व इराक मधे त्या देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत १५ – २० % इतकी आहे. कुर्द लोकांविषयी सर्वात जूनी नोंद ही ग्रीक प्रवासी वृत्तांतात सापडते. कुर्द लोक धर्माने सुन्नी मुसलमान असले तरीही ते अनेक इस्लामपूर्व रीतीरिवाज नेटाने पाळतात. पहिल्या महायुध्दाच्या आधी पासूनच कूर्द लोकांची वेगळ्या कुर्दीस्थान ची मागणी आहे. पहिल्या महायुध्दातील टर्कीच्या पराभवानंतर दोस्त राष्ट्रांनी वेगळ्या कुर्दीस्थानचं दिलेलं वचन आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. इराक आसो वा इतर देश या देशांमधे कूर्द लोकांवर अन्वित अत्याचार झाले. इराकच्या सद्दाम हुसेनने एकाच दिवशी रासायनिक अस्त्रे वापरुन ५००० कूर्द लोकांना मारलं आहे. म्हणूणच त्यानंतर कूर्द वीरांनी शस्त्र हाती घेतली. कूर्द स्त्रियांची पहिली पलटन ही १९९० साली अब्दुल्ला ओकलमान च्या Kurdist workers party (pkk) या मार्क्सवादी -लेनीनवादी विचारांच्या पार्टीने टर्की च्या डोंगराळ भागात उभारली. कूर्द स्त्री या इतिहासातही त्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखल्या जातात. ज्या काळात ब्रिटन मधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता त्या काळात Halabja प्रांतात Adela khanum ही कूर्द कमांडर आपल्या सैन्यासह राज्य करत होती तीला ब्रिटिश हे “princes of the Brave” या विशेषणांनी संबोधत असत. कूर्द महीला या पहील्या पासूनच राजकारणात सक्रीय आहेत ….Pietro Della या प्रवाशाने १६६७ साली आश्चर्याने नोंद केली आहे की “कूर्द स्त्रीया या मुस्लिम असूनही बुरखा वगरै काही घालत नाहीत त्या दिसायला अतिशय सुंदर आहेत “.
मध्यआशियात इतर स्त्रीयांच्या तुलनेत कूर्द स्त्रीया अधिक सुशिक्षित आहेत. १९५८ पासून कूर्द महिला या स्त्रीवादी मासिक चालवत आहेत. स्त्रीवादी चळवळीच्या अनेक परिषदाही कूर्दी महीलांनी घेतल्या आहेत यावर विश्वासच बसत नाही. पी.के.के. पार्टीच्या महीला लढवय्यांना वयाच्या १७ – १८ व्या वर्षा पासूनच कूर्दश डोंगराळ भागात सैन्य प्रशिक्षण दिलं जातं. इसिस च्या सैनिकांनी सिरीया व इराक च्या काही भागात राहणार्या सूर्य उपासक याझीदी या गैरइस्लामी जमातीतील स्त्रीयांना सेक्स गुलाम म्हणून भर बाजारात विक्रीला काढलं होतं. त्यातील अनेक जणींना या कूर्दी महीलांनी वाचवलं आहे त्यातील अनेक याझीदी तरुणी या कूर्दी तरुणींबरोबर आता सैन्य प्रशिक्षण घेत आहेत. सुरुवातीला टर्की च्या सरकारी फौजेशी लढणार्या या कूर्द महीलांनी SISI च्या विरोधातही जोरदार आघाडी उघडली आहे. ISIS ने अनेक कूर्द लोकांची गावेच्या गावे उध्वस्त केली आहेत कारण त्यांच्या मते कूर्द हे खरे मुस्लिमच नाहीत.पी.के.के. च्या सैनिक कूर्द तरुणींना अतिशय खडतर प्रशिक्षण दिलं जातं. तसेच त्यांना सेक्स आणि रोमान्स यापासून लांब राहण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. कूर्दी तरुणी ऐन युध्द फक्त रायफलच न वापरता उखळी तोफा, रनगाडा विरोधी अस्त्रे अगदी सहज चालवतात. सिरियाच्या अनेक प्रदेशात कूर्दी तरुणांच्या खांद्याला खांदा लावून या तरुणींनी अनेक भाग इसिस पासून मुक्त करण्यात यशस्वी झाल्या आहेत. पी.के.के चा प्रभाव असणार्या भागात Democratic union party ची सत्ता आहे तीथे या कूर्द स्त्रीयांच्या प्रभावामुळे मुस्लिम पुरुषांवर बहुपत्नीत्वार बंदी, स्त्री अत्याचार विरोधात कायदे, प्रशासकीय क्षेत्रात ૪०% महीलांसाठी जागा इत्यादी कल्याणकारी निर्णय राबवले जात आहेत.
टर्की प्रमाणे कूर्द तरुणींच्या अनेक पलटणी या सिरिया व इराक मधेही इसिस च्या विरोधात उभ्या राहील्या आहेत. २०१७ पर्यंत सिरीयात इसिस शी लढताना ३० कूर्द स्त्री कमांडर कामी आल्या आहेत. कूर्दीश लोकांना सद्दाम हूसेनच्या काळापासून अमेरिकेचा काही प्रमाणात पाठींबा मिळत आहे. तसेच इराकमधील किरकूक हा सर्वाधिक तेल उत्पादक भाग कूर्द बहुल भाग कूर्दलोकांनी ताब्यात घेऊन स्वतःच तेलाची विक्री करुन आर्थिक पाठबळ तयार केलं आहे. २५ सप्टेंबर २०१७ रोजी इराकमधे कूर्द लोकांनी वेगवेगळ्या कुर्दीस्थानसाठी सार्वमत घेतलं होतं. त्यांत ७२% लोकांनी वेगळ्या कुर्दीस्थानला पाठींबा दर्शवला आहे. परंतु ही कृती देशविरोधी ठरवत इराक सरकारने कूर्द लोकांनविरोधात सैन्य उतरवलं आहे. टर्की व सिरियात रशियाच्या मदतीने तेथील सरकार कूर्दांना परत एकदा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी रशियन ड्रोन वापरले जातात. या लांबपल्या च्या युध्दात म्हणूनच आता कूर्द स्त्रीया ही उतरल्या आहेत. कूर्द महीला या ड्रोन पासून लढण्याचे ही प्रशिक्षण घेत आहेत. गनिमी युध्दात निष्णांत असणार्या या कूर्द तरुणी जेव्हा पूर्ण ताकदीनिशी व हिमतीने लढाईच्या मैदानात उतरतात तेव्हा स्वतंत्र कुर्दीस्थानचं त्यांच स्वप्न आकार घेईल काय ? हे पाहणं रंजक ठरेल.
– प्रणव पाटील
(लेखक इतिहासाचे अभ्यासक असून आय.एल.एस महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत).