मुंबई प्रतिनिधि | विशाखा महाडीक
गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र अत्यंत उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. जो तो बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यात व्यग्र आहे. गणेशोत्सव आणि लालबाग यांचं नातं काही औरच आहे. या भागातील लालबागचा राजा तर अनेकांचे आराध्य. खूप अंतरावरून, मैलोनमैल प्रवास करून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहे. नुकतीच शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी ‘लालबागचा राजा’ची पहिली झलक सर्वांना पहायला मिळाली. यावेळी लालबागकारांचा उत्साह अत्यंत पाहण्याजोगा होता. यंदा लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023) रायगडाच्या देखाव्यात विराजमान झाला आहे. त्यामुळे अत्यंत पारंपरिक पद्धतीने बाप्पाची पहिली झलक दाखवण्यात आली.
यंदा लालबागच्या राजाचे ९०’वे वर्ष असून यंदाचा देखावा हा ऐतिहासिक आहे. राजाच्या दरबारी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली असून शिवराज्याभिषेकाचं दर्शन भाविकांना होणार आहे. अत्यंत भव्य, दिव्य आणि नेत्रदीपक अशी हि कलाकृती आहे. सोबतच आकर्षक फुलांची आरास, आवश्यक प्रकाशझोत या देखाव्याची शोभा आणखीच वाढवत आहेत. लालबागच्या राजाच्या दरबाराची ही सजावट दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारली आहे. ही त्यांची शेवटची कलाकृती ठरली. त्यामुळे २०२३ सालातील राजाचा दरबार हा कार्यकर्त्यांसाठी आणि देसाईंच्या चाहत्यांसाठी अत्यंत खास आहे. यावेळी मंडळाकडून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/posts/710734914404300?ref=embed_post
लालबागचा राजा हा नवसाला पावणारा बाप्पा आहे. त्यामुळे या बाप्पाचं आणि भक्तांचं अनोखं नातं आहे. जो तो बाप्पाचरणी लीन होतो. अगदी सामान्य माणसांपासून ते राजकीय नेतेमंडळी, सिनेकलाकार आणि बडे व्यापारीसुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी उत्सव कालावधीत आवर्जून येतात. उत्सव कालावधीत बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचा महासागर लोटताना दिसतो. केवळ राज्यभरातून नव्हे तर देशभरातून आणि अगदी विदेशातून देखील बाप्पाचे भक्त त्याच्या दर्शनासाठी आणि नवस करण्यासाठी येतात. लालबागचा राजा आपल्या मनोकामना पूर्ण करतो, असा भाविकांचा विश्वास आहे. अनेकांना तशी प्रचिती आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यंदाही अशीच गर्दी आणि असाच भक्तीचा नाद लालबागमध्ये पहायला मिळेल यात तसूभरही शंका नाही.