हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटीलला अखेर अटक (Lalit Patil Arrested) करण्यात आली आहे. पोलिसांनी चेन्नईतून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता त्याला लवकरच महाराष्ट्रात आणलं जाणार असून कोर्टासमोर हजर करण्यात येईल. पुणे पोलिसांची दहा पथके तसेच मुंबई व नाशिक पोलिस ललित पाटीलचा शोध घेत होती. अखेर २ ऑक्टोबर रोजी पळून गेलेला ललित पाटील १५ दिवसांनी सापडला आहे. पोलिसाना हे एक मोठं यश म्हणावं लागेल.
ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून ड्रगची तस्करी करत होता. हे रॅकेट उघड झाल्यानंतर ललित पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता. मागील १५ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसानी यापूर्वी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना ताब्यात घेतलं होते. परंतु ललित पाटीलचा शोध लागत नव्हता, पोलिसाना तो सातत्याने गुंगारा देत होता. आता मात्र त्यांना अटक करण्यात आली असून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ललित पाटील प्रकरणावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुद्धा महाराष्ट्राने बघितले. ललित पाटीलला रुग्णालयातून पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा आरोप राज्यातील विरोधी पक्षांनी केला होता. तसेच ससून रुग्णालयाची देखील मोठी नाच्चकी झाली होती. परंतु ललित पाटील अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून आणखी मोठी माहिती समोर येते का ते आता पाहावे लागेल. थोड्याच वेळात मुंबई पोलीस आयुक्त अधिकृत पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर बोलतील.