औरंगाबाद – घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत दोन मावसभावांचे शेजारी असलेले घर फोडून चोरट्यानी सोने-चांदीचे दागिने, रोख, एल.ई.डी टीव्ही असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी वडगाव कोल्हाटी येथील गंगोत्री पार्कमध्ये समोर आली. या प्रकरामुळे परिसरात राहिवाश्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रकाश कचरू आव्हाड, कैलास शंकर घुगे अशी दोन्ही मावस भावांची नावे आहेत.
या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, प्रकाश आणि कैलास हे मूळचे कन्नड तालुक्यातील रहिवाशी आहेत. रोजगारासाठी दोन्ही वडगाव कोल्हाटी येथे स्थायिक झाले. दोघांचे कुटुंब शेजारीच राहतात. चार दिवसांपूर्वी प्रकाशाच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे दोन्ही मावसभावांचे कुटुंब अंत्यविधीसाठी कन्नडला गेले होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून दोन्ही घरे बंद होती. ही संधी साधत चोरट्यानी बुधवारी मध्यरात्री दोन्ही घरांना लक्ष केले.
घराचे कुलूप तोडून चोरट्यानी प्रकाश यांच्या घरातील 50 हजार रुपये रोख, दोन सोन्याची पोत, कानातले दागिने असे सुमारे तीन तोळे सोने, कंपनीतून मिळालेले चांदीचे तीन शिक्के असा सुमारे दोन ते अडीच लाखाचा ऐवज प्रकाश यांच्या घरातून लंपास करण्यात आला तर कैलाश यांच्या घरातून भिंतीवर लावलेली एक एल.ई.डी.टीव्ही, सोन्याचे मंगळसूत्र, व चांदीचे दोन शिक्के असे लंपास करण्यात आले. अशी माहिती नातेवाईकांनी दिली.