भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम,HELLO Maharashtra मुंबई । झारखंड निवडणुकीचे निकाल पाहता देशातील जनता भाजपाविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, झारखंडसह, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. यामुळे देशातील इतर राज्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. सरळ दिसत आहे की भाजपाला उतरती कळा लागली आहे व आता ही उतरण थांबू शकणार नाही.

CAA आणि NRC ची आवश्यकता नव्हती

शरद पवार यांनी देशातील महत्वाच्या घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायद्याचा प्रभाव झारखंड निवडणुकांमध्ये दिसतोय. देशात CAA किंवा NRC सारखे कायदे आणण्याची आवश्यकता नव्हती. या मुद्द्यांवरून समाजात आणि देशात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होतोय.देशात अनेक राज्यात,शहरात याविरोधात मोर्चे सुरू आहेत. असेच सुरू राहिले तर माझी खात्री आहे की योग्य वेळी लोक झारखंड सारखेच उत्तर भाजपाला देतील. आता लोकचळवळ सुरू होत आहे, संघर्षाची तीव्रता वाढते आहे.

शांततेत आंदोलन करा

शरद पवार यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हंटले की, तुमचा राग शांत पद्धतीने व्यक्त करा. जाळपोळ करू नका, देशात अशांतता निर्माण होईल असे कोणी वागू नये. सत्तेवर असलेल्या घटकांनी याबाबत शांतपणे पावलं टाकली पाहिजेत.