वडा खात असताना तो तिला म्हणाला, “तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. !!” पहिल्या दोन लग्नावेळी अडथळा आलेल्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आंतरजातीय लग्नाची रंजक गोष्ट
किस्से राजकारणापलीकडचे । मी दलित आणि ती सीकेपी. थेट विषयालाच हात घालत आयुष्यात काय ठरवलं होतं आणि काय मिळालं त्याचा लेखाजोखा मांडणारा हा माणूस. दोस्ताच्या घरी झालेली ओळख झालेल्या पोरीला लक्षात ठेवलं आणि तिची सोबत केली ती कायमच. सुशीलकुमार शिंदे असं या अवलियाचं नाव. सुभाष विळेकर या शिंदेंच्या मित्राच्या भावाशी उज्ज्वल वैद्य यांचं लग्न झालं होत. हो. या उज्ज्वल वैद्य त्याच, ज्यांच्याशी पुढे सुशीलकुमारांनी आपली लग्नगाठ जुळवली. सुशीलकुमार पुण्यात कायद्याचं शिक्षण घेत असताना त्यांना मुंबईत पोलीस खात्यातील नोकरी मिळाली. उज्ज्वला वैद्य आणि त्यांचं कुटुंबीय मुंबईतच राहायला असल्यामुळे सुशीलकुमारांचं त्यांच्या घरी जाणं – येणं वाढलं. भेटी गाठी वाढल्यानंतर सुशीलकुमारांनी उज्ज्वला यांचं वर्णन काहीसं अशा ढंगात केलं आहे. “मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”
सुशीलकुमारांचं लग्न एकदा ठरलं होत. त्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये साखरपुडाही झाला होता. जानेवारीमध्ये लग्नाची तारीख असताना ऑक्टोबरमध्येच मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. यानंतर एका ब्राह्मण मुलीचं स्थळही सुशीलकुमारांना चालून आलं, पण काही कारणांनी तेही पुढं जाऊ शकलं नाही. त्यानंतर धाडस करून सुशीलकुमारांनी उज्ज्वला यांना डबल-डेकर बसमध्ये गाठलं. ८१ नंबरची ती बस, या दोघांच्या प्रेमविषयक गप्पांना नेहमीच आधार देत आली होती. त्या बसमधून उतरून दोघे एका हॉटेलात गेले आणि तिथेच सुशीलकुमारांनी वडा खात लग्नाचा विषय छेडला. “तू लग्नाला तयार आहेस का? तुझी इच्छा असलीच तर आजच मंगळसूत्र घेऊ” आणि ती म्हणाली, “माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.”
कोणताही मुहूर्त वगैरे न पाहता १ मे रोजी महाराष्ट्र दिनादिवशी या दोघांनी लग्न केलं. मोजक्या लोकांसोबत गिरगावमधील एका मंगल कार्यालयात दोघांनी लग्न केलं. घरच्यांना सांगितलं नव्हतं त्यामुळे ती नाराजी कशी सांभाळायची हा प्रश्न होताच. घरी थोडी रडारडही झालीच. पण सासूबाईंनी (स्नेहलता वैद्य) दोघांनाही देव्हाऱ्यासमोर बसवलं आणि दोघांनाही आपलंस केलं. खरं प्रेम असलं तर जात आडवी येत नाही हे सुशीलकुमारांना आणि उज्ज्वलाताईंना आजही प्रामाणिकपणे वाटतं. क्रांतिकारी विचार हा फक्त मनात ठेवायचा नाही तर तो कृतीतही आणायचा या विचाराने सुशीलकुमार पुढे चालत राहिले आणि उज्ज्वलाताईंनी त्यांना कायमच सोबत दिले. १९७० च्या दशकात एका उच्चभ्रू कुटुंबातून आलेल्या उज्ज्वलाताईंनी ३५० रुपये पगार असणाऱ्या सुशीलकुमारांना आहे त्या परिस्थितीत खंबीरपणे साथ दिली.
पुढे सुशीलकुमार आमदार झाले, खासदार झाले, राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि देशाचे गृहमंत्रीसुद्धा. आपल्या प्रेमविवाहामुळेच आपण एवढं सगळं बघू शकलो हे सुशीलकुमार प्रामाणिकपणे नमूद करतात. स्मृती, प्रीती आणि प्रणिती या तिन्ही मुलींना मोठ्या लाडाने सुशीलकुमार आणि उज्ज्वलाताईंनी वाढवलं. सुशीलकुमारांचा राजकीय वारसा प्रणिती शिंदे समर्थपणे सांभाळत आहेत. एकूणच नियतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सुशीलकुमार अजिबात कचरत नाहीत. बाकी राजकारण होत राहीलच, पण त्या राजकारणामागील अशा घटनाही त्या राजकारणाला आणखी रंजक बनवत असतात.