राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे सुतोवाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । लॉकडाऊनमुळं राज्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे औंध ते काळेवाडी साईचौक येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्धाटन आज अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे गेले दोन ते अडीच महिने राज्यातील सर्वच कामकाज व व्यवहार ठप्प आहे. याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. राज्यात मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज देणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. लॉकडाऊनमुळं ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतंच २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. शेती, उद्योगांसह विविध क्षेत्रांसाठी या पॅकेजच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं.

‘केंद्राच्या पॅकेजमधून प्रत्यक्षात राज्यांच्या हाती काय पडणार आहे याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काहींच्या मते हे केवळ मोठमोठे आकडे आहेत. हातावर पोट असलेल्या माणसाला मदत करण्याची खरी गरज आहे,’ असं अजित पवार म्हणाले. लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. त्यानंतर काय असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, ‘केंद्र सरकारचा याबाबतचा निर्णय पंतप्रधान मोदी जाहीर करतील. यापुढं लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी ते राज्य सरकारवर सोपवतील अशी दाट शक्यता आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”