पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे,
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज मंगळवारी पार पडत आहे. या मतदानात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बारामतीतून सुप्रीय सुळे, जालन्यातून रावसाहेब दानवे, हातकणंगले मधून राजू शेट्टी, अहमदनगर मधून सुजय विखे पाटील आणि रायगड मधून अनंत गीते यांचे भवितव्य मतदार आज मतदानातून ठरवणार आहेत.
हे तीन नेते विजयाची हॅट्रिक करणार काय?
२००९ साली लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम विजयी झालेले तीन नेते तिसऱ्या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जात आहेत. यात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांचा समावेश होतो. त्यापैकी उदयनराजे भोसले यांचा विजय गृहीत धरला जात आहे. तर राजू शेट्टी यांच्या समोर शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. तसेच बारामतीत कमळ फुलवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजपच्या नेत्यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्या समोर कांचन कुल यांच्या रूपाने मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना म्हणावे तेवढे मैदान सोपे राहिले नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील हे तीन खासदार तीसर्यांदा विजय संपादित करून विजयाची हॅट्रिक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माढा कोणाला कौल देणार?
शरद पवार यांनी स्व:ताची उमेदवारी जाहीर केल्या पासून ते त्यांनी माघार घेई पर्यत त्यानंतर संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेपर्यंत अत्यंत नाट्यमय हलचाली घडलेला मतदार संघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात देखील मतदार आज राष्ट्रवादीचे आणि भाजपचे भवितव्य ठरवणार आहेत. राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात कडवी लढत होत आहे. त्यामुळे माढ्याची जनता कोणाला कौल देणार हे पाहण्यासाठी राजकीय जाणकारांचे डोळे माढ्याकडे लागून राहिले आहेत.
अहमदनगरमध्ये काय होणार निकाल
विखे पाटील घराण्याचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या खोडा घालण्याने कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपने अहमदनगर मधून उमेदवारी देखील दिली. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने तरूण आमदार संग्राम जगताप यांना उतरवले. सुजय आणि संग्राम या युवा उमेदवारांच्या मध्ये लोकसभेच्या विजयासाठी चांगलीच रस्सी खेच झाली आहे. आज अखेर मतदार आपला मताचा अधिकार बजावणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या मतदारसंघात होत आहे तिसऱ्या टप्प्याचे मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, माढा, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले