सोलापूर प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माढा मतदारसंघाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. मतदार आणि राजकीय जाणकारांची उत्सुकता कधीच वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि माढा मतदारसंघाची मतमोजणी रामवाडी येथील शासकीय गोदामात होणार आहे. याठिकाणी सकाळी आठ वाजता हि मतमोजणी सुरु होणार आहे. इतर ठिकाणी मतमोजणी सकाळी ७ वाजता सुरु होणार होती मात्र या ठिकाणी हि मतमोजणी आठ वाजता सुरु होणार असल्याने निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
माढा आणि सोलापूर मतदारसंघात मतमोजणीच्या २६ फेऱ्या होणार असून मतमोजणीसाठी २४ तासाचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. मात्र २४ तासाच्या आधी देखील मतमोजणी पूर्ण केली जाऊ शकते. तसेच मतमोजणी केंद्रावर नोंदणीकृत पत्रकार वगळता अन्य कोणालाही मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने अनुमती दिल्या शिवाय अंतिम निकाल जाहीर करता येणार नाही अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा सोलापूर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय शिंदे असा सामना होत आहे. संजय शिंदे यांनी भाजपला चांगलीच टक्कर दिल्याने हि निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यामुळे येथे काय निकाल लागतो याची सर्वांना उत्सुकता आहे. तर तिकडे सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे भाजपचे जय सिध्देश्वर महास्वामी आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे येथील निकाल देखील पाहण्यासारखा राहणार आहे.