नवी दिल्ली | पोलादपूर जवळ आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या बस अपघातातील मृतांना आज लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. संसदीय शिष्टाचारा नुसार आज सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी मृतकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळले.
दिनांक २८ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास पोलादपूर जवळ मिनी बसचा अपघात झाला. या अपघातात ३० लोक जागीच ठार झाले होते. फक्त एक व्यक्ती या अपघातातून बचावला होता. बस मधील सर्व लोक हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. या घटनेवर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी ही ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले होते.