हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडची धकधक गर्ल आणि आपल्या जबरदस्त अभिनयाने एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) लढवणार असल्याच्या चर्चा उधाण आला आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले आणि या सर्व चर्चा सुरु झाल्या. माधुरी दीक्षित यांच्याशिवाय प्रसिद्ध वकील उज्वल निकम हे सुद्धा भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू आहेत.
अमित शाह (Amit Shah) यांनी काल मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा केली. यावेळी मुंबईतून माधुरी दीक्षित, जळगावमधून उज्वल निकम, पुण्यातून सुनील देवधर आणि धुळ्यातून प्रतापराव दीघावकर यांना तिकीट देण्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. परंतु हे चौघेही निवडणूक लढवण्यास खरच इच्छुक आहेत का याची चाचपणी भाजप करेल. आणि त्यांची मते विचारात घेईल.
दरम्यान, मुंबईमध्ये लोकसभेचे एकूण ६ मतदारसंघ आहेत. यातील ३ जागेवर भाजपचे खासदार आहेत. तर २ जागेवर शिंदे गट आणि एका जागेवर ठाकरे गटाचा खासदार आहे. भाजपच्या ३ खासदारांपैकी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मनोज कोटक, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी, आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत. त्यामुळे जर माधुरी दीक्षित यांना भाजपने मुंबईतून उमेदवारी दिली तर नेमका कोणाचा पत्ता कट होणार याकडे बघितलं पाहिजे.