वाशिम प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा धडाडल्या आहेत. रॅली, फेरी, मतदारांच्या भेटी, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट असे फंडे वापरून अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. वाशीममधील कारंजा विधानसभा मतदारसंघात यानिमित्ताने वेगळाच प्रकार पहायला मिळाला. या मतदारसंघात बसपाच्या कार्यकर्त्यांनी जादूचे प्रयोग दाखवून आपल्या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार युसुफ पुंजानी यांनी ग्रामीण भागात जादूगाराच्या सहाय्याने गावागावात प्रचार सुरू केला आहे. जादूगार गल्ली गल्लीत फिरून मतदारास आकर्षित करून बसपाच्या हत्तीलाच मतदान करा अस आवाहन करीत आहेत. बसपाच्या या अनोख्या प्रयोगाची तर सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांना आवाहन करणं तसेच गावागावात सभा घेणं हे प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र वाशीममध्ये बसपाकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेत आहे. अशा प्रकारचा प्रचार करून बसपाला याचा किती फायदा होतो हे निवडणुकीचा निकालानंतरच पहायला मिळेल.