महाबळेश्वर पालिकेत सभेपूर्वी वादग्रस्त विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा 2 जुन रोजी नगराध्यक्षांनी बोलविली असुन विषयपत्रिके मधील पहील्याच वादग्रस्त विषयावरून अल्पमतातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. पहीला विषय वगळुन पुन्हा सभा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मुख्याधिकारी यांचेकडे निवेदन देवून केली आहे. त्यामुळे या सभेचे भवितव्याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

या पुर्वी पालिकेची सर्वसाधारण सभा 31 मार्च रोजी ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकुण 84 विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. परंतु, नगराध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर नाराज असलेल्या नगरसेवकांनी या सभेला दांडी मारली. कोरम अभावी ही सभा नगराध्यक्षांनी रद्द् करण्याऐवजी तहकुब केली. नगराध्यक्षांनी तहकुब केलेली सभा 1 एप्रिल रोजी पुन्हा आयोजित करण्यात आली. या सभेला ही विरोधकांनी गैरहजेरी लावली.

1 एप्रिल रोजी होणारी सभा बेकायदेशीर असल्याने या सभेला मुख्याधिकारी पल्लवी पाटील या देखिल गैरहजर राहील्या होत्या. तहकुब केलेल्या सर्वसाधारण सभेस कोरमची आवश्यक्ता नसते या नियमानुसार नगराध्यक्षांनी सभेतील सर्व विषय मंजुर केले. बहुमत नसताना नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेतील सर्व विषय मंजुर केल्याने विरोधकांमध्ये एकच खळबळ माजली. दरम्यान 1 एप्रिलची सभा बेकायदेशीर असल्याची तक्रार विरोधकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली.

दरम्यान मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी देखिल 308 कलमाचा आधार घेवुन जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन सादर केले होते. मुख्याधिकारी व 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी 1 एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला स्थगिती दिली. तसेच या सभेतील ठरावांची अंमजबजावणीसाठी ब्रेक लावला होता.

जिल्हाधिकारी यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील कामकाजाच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली असतानाही नगराध्यक्षां यांनी मनमानी करून 2 जुन रोजी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेत वादग्रस्त सभेचे कामकाज कायम करण्याचा पहिला विषय घेतला आहे. ज्या सभेला जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिली आहे. त्या सभेचे कामकाज कायम करणे हे नियमबाहय होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग होणार आहे म्हणुन विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी आज उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची भेट घेतली व त्यांना निवेदन देवुन बुधवारी होत असलेल्या सभेतील पहिला विषय वगळुन पुन्हा सर्वसाधारण सभा आयोजित करावी, अशी मागणी केली आहे. नगरसेवकांसह तौफिक पटवेकर हे देखिल यावेळी उपस्थित होते.

विरोधी गटात असलेले काही नगरसेवक सत्ताधारी आघाडीचे सदस्य असल्याने त्या पैकी काही नगरसेवकांना याही वेळेस व्हिप बजावण्यात आला आहे. 31 मार्चच्या सर्वसाधारण सभेसाठी देखिल नगराध्यक्षांचे पती व नगरसेवक कुमार शिंदे यांनी व्हिप बजावला होता. हा व्हिप अनेक नगरसेवकांनी धुडकावला होता. त्यामुळे 2 जुन रोजीच्या सर्वसाधारण सभेतही याची पुर्नरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने या ऑनलाईन होत असलेल्या सभेकडे शहराचे लक्ष लागुन राहीले आहे.

Leave a Comment