नवी दिल्ली । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसनं शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांचा फायदा होईल असं कामं करा,” असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला. फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली.
महाजॉब्स पोर्टल संदर्भातील जाहिरातीवरून काँग्रेसच्या नाराजीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना फडणवीस म्हणाले, ”आमचं म्हणणं एवढंच आहे की, फोटो कुणाचेही छापा. पण, तुम्ही ज्या मोठंमोठ्या घोषणा केल्या आहेत. इतक्या लोकांना रोजगार देऊ, इतक्या लोकांना नोकऱ्या मिळेल. इतक्या कंपन्या येतील. त्यासंदर्भात काहीतरी कार्यवाही करा. बाकी तुम्हाला ज्याचे फोटो छापायचे आहेत आणि ज्यांचे चेहरे दाखवायचे आहेत, त्यांचे दाखवा. आपापसात मारामाऱ्या करा, काहीही करा, फक्त लोकांना फायदा झाला पाहिजे असा विचार करा,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, शरद पवारा यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “शरद पवार त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय आणि अशी काही स्पर्धा नाहीये की त्यांनी काय केलं म्हणून आम्ही करायचं. तसेच आम्ही काय केलं म्हणून त्यांनी काय करायचं. आम्हाला असं वाटतं की, सध्या साखर उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या पक्षातील साखर उद्योगात असलेल्या नेत्यांनीही याचं गांभिर्य आमच्या लक्षात आणून दिलं आहे. केंद्रात आमचं सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे आम्ही मागणी घेऊन जाणं, हे अपेक्षितच आहे म्हणून आम्ही आलो आहोत,” असं फडणवीस यांनी म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”