मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आहे. सदर प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर शिवसेनेवर दबाव वाढत आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आलं होतं. यावेळी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.