कोरोनामुळं राज्यावर आर्थिक संकट, बेरोजगारी वाढणार- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । करोनामुळे राज्यावर अर्थसंकट येणार आहे. ते आलेलं आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे करोनाचे परिणाम एक ते वर्ष जाणवतील,’ असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ”करोना हे संकट आहे. त्याचबरोबर आता दुसरं संकट राज्यावर येत आहे. काही अंशी ते आलं आहे. करोना आणि लॉकडाउनचे आर्थिक परिणाम दिसून येतं आहेत. अर्थकारणावर फार मोठा परिणाम होताना दिसत आहेत. लॉकडाउनमुळे उद्योग बंद आहेत. कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. उत्पादनाची साखळी ठप्प झाली आहे. त्यामुळे उद्योग आणि इतर क्षेत्रही आर्थिक अडचणीत आली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात याचे विपरित परिणाम जाणवणार आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे संकट मोठं आहे. त्यासाठी आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यादृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, करोनाच्या संकटाशी आपण संयमानं मुकाबला करू,’’असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

ते पुढे म्हणाले, ”करोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापूर्वी २१ दिवसांचा लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. १४ एप्रिल रोजी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. संकटाच्या या काळात पंतप्रधान नरेद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सातत्यानं संवाद साधत आहेत. आता लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. देशात वाढलेल्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या चिंताजनक आहे. जगातील स्थितीशी मी याची तुलना करणार नाही. पण, आपण नियमाचं पालन करायला हवं,’’ असं पवार यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment