वायर जोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक खांबावर चढवलं अन् …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विद्युत खांबावर चढलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंकज दरबारसिंग गिरासे असे जीव गमावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे वायर जोडण्यासाठी तो विद्युत पोलवर चढला होता. नंदुरबार तालुक्यातील अमळथे शिवारामध्ये हि घटना घडली आहे. सबस्टेशनवरुन अचानक वीज पुरवठा सुरु केल्याने पंकज दरबारसिंग गिरासे यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. यानंतर महावितरण कंपनीच्या निष्काळजीमुळे पंकजसिंग गिरासे या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीदेखील गावकऱ्यांनी केली.

काय आहे प्रकरण?
नंदुरबार तालुक्यातील अमळथे शिवारात तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मुत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. अमळथे शिवारात विद्युत रोहित्र जळाल्यामुळे ते जोडण्याचे काम सुरु होते. यादरम्यान अमळथे येथील पंकज दरबारसिंग गिरासे या व्यक्तीला महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलवर चढवून वायर जोडण्यास सांगितले. या कामासाठी कोपर्ली सबस्टेशनवरुन वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र अचानक कोपर्ली सबस्टेशनवरुन वीज पुरवठा सुरु केल्याने पंकजसिंग गिरासे यांचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला.

ग्रामस्थांचा सब स्टेशनला घेराव
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पंकजसिंग गिरासे यांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप गावकऱ्यांनी केला. या घटनेनंतर सुमारे चार तासांपर्यंत कुठलाही महावितरणचा अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता. यानंतर ग्रामस्थांनी संतापून कोपार्ली येथील सब स्टेशनला घेराव घालून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ त्या ठिकाणी थांबून होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात बोलावण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.