मुंबई । कोरोनाच्या आजारातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्या संदर्भातील माहिती योग्य प्रकारे प्रसिद्ध केल्यास लोकांना दिलासा मिळेला. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास वाढेल. त्यामुळं आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी व केंद्र सरकारनं त्याबाबतचं एक न्यूज बुलेटिन काढावं, अशी महत्त्वपूर्ण सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.
काल बुधवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलून काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणल्या असल्याचं राज यांनी सांगितलं. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली. राज यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये कोरोनाच्या संकटात काय काय अधिक करणं गरजेचं आहे यावर आपल्या सूचना राज्य सरकारला सुचवल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये राज लिहितात, ‘कोरोनाच्या आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आश्वासक आहे. कल्याणमधील ६ महिन्यांच्या मुलीसह हजारो जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, ह्या आकडेवारीला सरकारी व इतर माध्यमांच्या पातळीवर पुरेशी प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. ती मिळाली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल, असं राज यांनी म्हटलं आहे. ‘आजार नियंत्रणात आहे हे दाखवलं गेलं तर नागरिक लगेच बाहेर पडतील हा समज चुकीचा आहे, असंही राज यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रुग्णांना वाळीत टाकणे चुकीचे
कोरोनाच्या नुसत्या संशयावरून व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा व सर्वांसाठीच नुकसानकारक आहे. असं होत राहिलं तर लोकांचा कल आजाराची लक्षणं लपवण्याकडे राहील आणि पर्यायाने लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील. टी. बी. सारखे संसर्गजन्य आजार असतानाही रुग्णांना वाळीत टाकलं नाही, मग आत्ताच का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यावर उपाय म्हणून करोनामुक्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी देणारं एक न्यूज बुलेटिन आठवड्यातून एकदा जारी केलं जावं. माध्यमांनी देखील ह्या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
https://www.facebook.com/RajThackeray/posts/787930051738146
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”