हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने नेरळ पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. “इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणे. तसेच पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देणे, अशाप्रकारचे गंभीर आरोप महिलेने केले असल्याने त्याची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची देखील कारवाई केली जाईल, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या कि, “एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्वीकार न करणारे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. नाईक यांना याप्रकरणी तात्काळ अटक करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाईल”, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.
नाईक यांच्या विरोधात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल
भगजप आमदार गणेश नाईक यांनी 2010 ते 2017 दरम्यान शारीरिक अत्याचार केला. रात्री उशिरा घरात शिरुन गणेश नाईकांनी शारिरीक अत्याचार केला, असे गंभीर आरोप महिलेने केले आहेत. संबंधित आरोपांप्रकरणी गणेश नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.