विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून हैदराबाद येथे अटक, IIT पास आऊट आहे आरोपी

Virat Kohli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 23 वर्षीय रामनागेश श्रीनिवास अगुबाथिनी याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने हैदराबाद येथून अटक केली आहे. अगुबाथिनी व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. यापूर्वी तो फूड डिलिव्हरी अ‍ॅपसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करत असे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस आता अगुबथिनीला मुंबईत आणत आहेत. त्याने आयआयटी हैदराबादमधून बीटेक केले आहे. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला ऑनलाइन ट्रोल करण्यात आले होते. त्यांच्या 9 महिन्यांच्या मुलीलाही धमकावण्यात आले.

यावर दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीसही बजावली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले होते की,’9 महिन्यांच्या मुलीला ट्विटरवर ज्या प्रकारे धमक्या येत आहेत, ते खरोखरच लाजिरवाणे आहे.’

ट्रोलर्सनी मोहम्मद शमीवरही निशाणा साधला
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्याला त्याच्या धर्मावरून ट्रोल केले जात होते. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहली आणि जवळपास संपूर्ण टीम इंडियाला सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आले.

यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत, धोनीला आल्या होत्या धमक्या
ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला देखील आयपीएल 2020 मधील चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरी आणि प्लेऑफमधून बाहेर पडताना अशा धमक्या आल्या होत्या. अशा वर्तनावर आणि धमक्यांची सोशल मीडियावरही जोरदार टीका झाली.