पत्नी घरी न आल्यामुळे पतीने रागाच्या भरात उचलले ‘हे’ पाऊल

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका जावयाने सासरवाडीत जाऊन सासू व पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले आहेत. यामध्ये सासूचा जागीच मृत्यू तर आरोपीची पत्नी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा पूर्णा या ठिकाणी घडली आहे. पुष्पा उर्फ रुक्माबाई इंगळे असे मृत महिलेचे नाव असून ती टाकरखेडा पूर्णा येथील रहिवासी आहे. तर स्नेहल दिनेश बोरखडे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीच्या पत्नीचे नाव आहे. आपल्या पत्नीवर व सासूवर जीवघेणा हल्ला करुन आरोपी दिनेश बोरखडे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

सासूवर कुऱ्हाडीने सपासप वार
आरोपीची पत्नी स्नेहल या आई आजारी असल्याने माहेरी गेल्या होत्या. मात्र पत्नी परत घरी न आल्याने आरोपी दिनेश हा सासरवाडीला गेला. त्या ठिकाणी त्याने आपल्या पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीची सासू या दोघांचे भांडण सोडवण्यास गेली असता आरोपीने रागाच्या भरात आपल्या सासुवर कुर्‍हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात आपल्या सासूचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी दिनेश घटनास्थळावरुन फरार झाला. या हल्ल्यामध्ये आरोपीची पत्नी स्नेहल हीदेखील गंभीर जखमी झाली आहे.

आरोपीचा शोध सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत महिलेचे शव शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेशवर खुनाचा गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी दिनेश हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी दिनेशचा शोध लागल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.