भाजपने अमृता फडणवीसांना पक्षाचे प्रवक्तेपद द्यावे; मनिषा कायंदेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. यावरून शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “अमृता फडणवीस ज्याप्रकारची वक्तव्ये करतात ती भाजपमधीलच अनेक नेत्यांना आवडत नाही. पण केवळ त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्यामुळे भाजपचे नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. भाजपने अमृता फडणवीसांना पक्षाचे प्रवक्तेपद द्यावे,” असा टोला कायंदे यांनी लगावला आहे.

मनीषा कायदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, अमृता फडणवीस यांनी ट्विट करीत जी विधाने केली आहेत. त्यामागील कारण म्हणजे फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत. त्याच नैराश्यातून अमृता फडणवीस टीका करत असतात. अनेकदा अमृता फडणवीसांना आपण काय बोलतोय, हेच समजत नाही.

वास्तविक पाहता भाजपच्या नेत्यांनाही अमृता फडणवीस यांची वक्तव्ये आवडत नाहीत. कारण त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे अनेकदा पक्ष अडचणीत येतो. परंतु, अमृता या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी असल्यामुळे भाजपचे नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. त्यामुळे भाजपने किमान अमृता फडणवीस यांना पक्षाचे प्रवक्तेपद देऊनच टाकावे, असे कायंदे यांनी म्हटले.

अमृता फडणवीस यांनी काय केले आहे ट्विट?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत, नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. नामर्द, बिगड़े नवाब आणि नन्हें पटोले, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता अमृता फडणवीसांवर टीका केली जाऊ लागली आहे.