हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना, जरांगे यांनी राज्य सरकारकडे मराठा समाजाच्या १० प्रमुख मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा भाग बनला आहे.
मनोज जरांगे यांच्या मागण्या
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्वरित अंमलबजावणी करावी, असे जरांगे यांनी स्पष्ट सांगितले आहे. जरांगेंनी आपल्या मागण्यांमध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ‘सगे सोयरे’ कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करावी आणि आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, असे प्रमूख मुद्दे मांडले आहेत. तसेच, न्यायमूर्ती संपत शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हणले आहे.
जरांगे यांनी म्हणले आहे की, “एक वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर आहे, पण सरकारला आमच्या दु:खाची जाण नाही. आज मराठा समाज अधिक मोठ्या प्रमाणात संघटित झाला आहे आणि आता आरक्षणासाठी आम्ही सरकारवर अधिक दबाव टाकू.” यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत, “जर लवकरच ठोस निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पसरू शकते” असे म्हणले आहे.
महत्वाचे म्हणजे, या उपोषणात त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणाला सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. यासह “ही लढाई आमच्या हक्कांची आहे, त्यामुळे आता मागे हटणार नाही,” असे ठामपणे सांगितले आहे. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. यावर भाष्य करत, मराठा समाजाला योग्य न्याय मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे.