मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या! सरकारच्या निर्णयावर जरांगे पाटलांची ठाम भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, “उद्यापासून राज्यांतील ज्या मराठ्यांच्या जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल” अशी घोषणा केली होती. त्यावर आता उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असे जरांगे पाटलांकडून सांगण्यात आले आहे. जर सरकारने फक्त मोजक्या लोकांचा कुणबी प्रमाणपत्र वाटले तर हे आंदोलन आणखीन तीव्र होईल, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे.

आज एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटलांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हणले की, “पुरावे असलेल्यांच कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार आहे. सरकारने उद्याच महाराष्ट्रातील सर्व कलेक्टर यांना बोलवावे आणि यावर योग्य निर्णय घ्यावा. 1 नोव्हेंबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. हा टप्पा सुरू झाला की सरकारला बैठका घ्यायला ही वेळ मिळणार नाही. तसेच, फक्त काही लोकांचा कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर हे आंदोलन आणखीन तीव्र होईल”

दरम्यान, आज मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षण उपसमितीसोबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांची संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हणले की, “मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समितीने आज पहिला अहवाल सादर केला आहे. शिंदे समितीमध्ये जवळपास एक कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी झाली आहे. यात 11 हजार 530 कुणबी जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे सरकार फक्त याच लोकांना कुणबी प्रमाणपत्र देईल” सध्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाला मराठा बांधव आणि जरांगे पाटील यांच्याकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे.