हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू” असा थेट इशारा मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच, ‘जे आमचं आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही घास हिरावून घेत नाही’ असे देखील म्हणले.
बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने जर 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण दिलं नाही तर कोण कोण नेते ओबीसीमध्ये 20 वर्षांपासून आहेत आणि आपलं आरक्षण कुणी दिलं नाही, ती नावं जाहीर आम्ही जाहीर करणार आहोत. जे आमचं आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही घास हिरावून घेत नाही”
त्याचबरोबर, “आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळाव्यात, ज्यांनी आमच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकायला हवं. आम्हाला आमच्या हक्काचं मिळायला हवं. तसेच, ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे” असे जरांगे पाटील म्हणाले. पुढे बोलताना, मराठ्यांना पुरावे मिळू नयेत ही फक्त नेत्यांची भावना आहे अशी टीका देखील त्यांनी केली
दिवाळी साजरी करणार नाही…
इतकेच नव्हे तर, “पुरावे असताना 40 वर्षे मराठा समाजाचं वाटोळं झालं. पण आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय. आम्हाला आरक्षण मिळतंय. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. परंतु, आरक्षण मिळेपर्यंत मी फटाके वाजवणार नाही, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केली, त्यांच्या घरात अंधार आणि मी आनंद कसा व्यक्त करू, मी दिवाळी साजरी करणार नाही” अशी भूमिका पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी मांडली.