हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. तत्पूर्वी त्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट घेत न्यायालयात टिकणारे आणि 50 टक्केच्या आतील मराठा आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचे सविस्तर म्हणणे अजितदादांनी ऐकून घेतले. तसेच यासंदर्भात उद्या (सोमवारी) मंत्रालयात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही अजितदादांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादांना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आपणास कळवू इच्छितो की, मराठा समाज हा बहूसंख्येने शेतकरी आहे, शेतमजूर आणि मोलमजुरी करणारा आहे. माथाडी कामगार आहे, डबेवाला, असंघटीत कामगार आहे. मराठा समाजामध्ये शैक्षणिक व सामाजिक स्तर खूप खालावलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मुख्य
प्रवाहात येण्यासाठी आर्टिकल 14 नुसार त्यांना समान संधी व समान न्याय मिळणे गरजेचे असल्यामुळे मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. तरी मराठा समाजाला 50% मर्यादेत व ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही विनंती.
याविषयी आम्ही विधानसभा काळात 200 हून अधिक आमदार व मंत्री महोदयांना निवेदनातून मागणी केली होती.
त्याप्रमाणे दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी कोल्हापुर येथे मराठा आरक्षण संघर्ष समीती महाराष्ट्र तर्फे संचालक आपणास 50% आतील ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्याबाबत कोल्हापुर येथे निवेदन देण्यात आले होते. त्यावर आपण आश्वासन दिले होते की, मी मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्री
एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस व मी तसेच मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत आपल्या शिष्टमंडळाची बैठक बोलावून तोडगा काढू. पण अद्याप तरी बैठक झालेली नाही. तरी ती बैठक त्वरित आयोजित करावी व आपल्या मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, अशा आशयाचे निवेदन आज उपमुख्यमंत्री अजितदादांना देण्यात आली.