Saturday, March 25, 2023

धक्कादायक! मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात, लातूरमध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

- Advertisement -

लातूर । मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या लातूरमधील एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. चाकूर तहसील कार्यालयासमोर विषारी औषध पिऊन त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. किशोर गिरीधर कदम असे या युवकाचे नाव आहे. या युवकाला लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी दिली. चाकूरमध्ये प्राथमिक उपचार करून त्या युवकाला लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी घटना प्रशासनाला कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता केल्याचेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.

लातूर जिल्ह्यातील बोरगावमधील किशोर कदम या 25 वर्षीय या तरुणाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. बीएड झालेला हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (9 सप्टेंबर) राज्यातील मराठा आरक्षणाला स्थिगीती दिल्यामुळे हताश झालेल्या या तरुणाने एका बाटलीत विषारी औषध आणले होते. तहसील कार्यालयापुढे येताच त्यांने बाटलीतील विषारी औषध प्राशान केले. याची माहिती तहसील प्रशासनाला काहींनी दिली.

- Advertisement -

विषारी औषध घेतल्यानंतर हा तरुण ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ अशी घोषणाही देत होता. त्यानंतर त्या युवकाला तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी चाकूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. दरम्यान, मात्र आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आपले आणि मराठा समाजाचे भवितव्य अंधकारमय झाले असल्याची एक चिठ्ठी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या तरुणाने खिशात लिहून ठेवली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.