मुंबई प्रतिनिधी | मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या खटल्याचा निकाल हा सरकारने केलेल्या कायद्याच्या बाजूने दिला आहे. इथून पुढे मराठा समाजाला नोकरीत १२ टक्के तर शिक्षणात १३ टक्के आरक्षण देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने कायदा करण्यासाठी फडणवीस सरकारने केलेले प्रयत्न फळाला आले आहेत असे बोलले जाते आहे. तर मराठा आंदोलनाचा देखील हा विजय आहे असे म्हणले जाते आहे. अशातच आज मराठा आरक्षण समन्वय समितीने उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
मराठा समन्वय समितीने उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या दृष्टीने भविष्यात द्याव्या लागणाऱ्या लढ्या बाबत बातचीत केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण दिलेल्या लढ्या बद्दल मी आपले अभिनंदन करतो असे म्हणले. त्याच प्रमाणे तुमच्या आणि माझ्या हृदयात भगवा आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा दिल्लीत गेला तरी आपण तो लढा जिंकू असे उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे.
कोणाच्याही ताटातील अन्न हिरावून कोणाच्याही ताटात वाढण्यात आले नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने त्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर टीका करण्याचे काही समाज प्रवृत्तींनी सोडून द्यावे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.