मुंबई तुंबई! पावसाला एक अक्कल नाही, म्हणत केदार शिंदेंचा मुंबई महानगरपालिकेला टोला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसात पावसाने मुंबईला नुसते झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचे तळे पाहायला मिळाले. तसे पाहता या वर्षातील हा पहिलाच पाऊस. त्यात पहिल्याच पावसात मुंबई व उपनगरांत पाणी अगदी कंबरेपर्यंत तुंबल्याने विरोधकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला चांगलेच सुनावले. भाजपने तर नालेसफाईचा दावा फोल ठरला असून यात मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा थेट आरोपच केलाय. या सगळ्यात पावसाला एक अक्कल नाही असे ट्वीट करत मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बीएमसीला उपहासी टोला लगावला आहे.

मराठी दिगदर्शक केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्वीटर हँडलवर एक ट्विट करीत त्यात लिहिले आहे की, पावसाला एक अक्कल नाही. ५० मीमी पर्यंत संरक्षणाची व्यवस्था बीएमसीने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो. केदार शिंदे यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगेलच वायरल होताना दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या ट्विटला समर्थन करीत रिट्विट करताना दिसत आहेत. त्यात नवीन काय? वर्षानुवर्षे हेच तर चालू आहे. मग याच वर्षी अपेक्षा का? अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

पहिल्या पाऊसामुळे मुंबईत पाणी तुंबल्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. “साधारणपणे २४ तासांत १६५ मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी होते असं मानतो. परंतु, मुंबईत आतापर्यंत १४० ते १६० मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात ६० मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सायन-दादर परिसरात १५५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबलं आहे”, असे चहल यांनी सांगितले.

तर मुंबईत १०७ टक्के आणि १०४ टक्के नालेसफाईचे दावे पहिल्याच पावसाच फोल ठरले असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.तसेच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही मुंबईत पाणी तुंबणार नसल्याच्या शिवसेनेचा दावा अगदीच खोटा ठरल्याचे विशेष असे नमूद केले आहे. याबाबत बोलताना मुंबई महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईतील नाले ते समुद्राच्या तळाशी आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही असं कुणीच दावा करू शकत नाही. पण साचलेल्या पाण्याचा चार ते पाच तासांत निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

You might also like