Sunday, June 4, 2023

विवाहीत प्रेमी युगुलानं असं का केलं? कंपनीतलं काम उरकून रात्री ऊसाच्या शेतात आले अन्..

सांगली : कुपवाड शहरातील कुपवाड-बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या नांद्रेकर यांच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये एका प्रेमी युगुलांनी विष प्राशन करून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

राजू महादेव माळी व रीना किरण पार्लेकर अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. आत्महत्या केलेले प्रेमीयुगल हे कुपवाड औद्योगिक वसाहती मधील एका गारमेंटमध्ये नोकरीस आहेत. यातील मयत माळी हे कुपवाड-बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या खोत मळ्यामध्ये राहावयास आहेत. या ठिकाणी सबंधित महिलेची ये-जा असल्याची माहिती मिळाली.

याठिकाणी असलेल्या नांद्रेकर मळ्यामध्ये ऊसाच्या शेतीमध्ये असणाऱ्या गोठ्यासाठी बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कंपनीमधील काम संपवून दोघेजण शुक्रवारी रात्री एकत्र आले. त्याठिकाणी उसाच्या शेतीमध्ये विष प्राशन करून दोघांनी शेडमधील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. शनिवारी सकाळी सबंधित शेतकरी हे गोठ्याकडे आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानी ही घटना त्वरित एमआयडीसी पोलिसांना कळविली.

एमआयडीसी स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आत्महत्या केलेल्या केलेल्या दोघा प्रेमी युगुलांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू असून एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

दरम्यान, तासगाव तालुक्यातील सावर्डे गावात प्रेमी युगुलांची आत्महत्या झाली होती. या घटनेने जिल्हा हादरला होता. या घटनेपाठोपाठ कुपवाड शहरात शनिवारी प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याने शहर हादरले असून शहर परीसरात खळबळ उडाली आहे.