हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अक्षरश: कहर केला आहे. जगभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढ होत असून चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरिएंटचे ४ रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भारत सरकारही अलर्ट झालं असून राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात आजपासून (२३ डिसेंबर) मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरात भाविकांसाठी मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी येताना गणेशभक्तांनी मास्क वापरण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झाले असून दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात आजपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आज मास्कबाबत निर्णय होऊ शकतो. मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तसेच भाविकांनाही मास्क वारण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहेत.
राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक
भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार आहे.