मुंबई । सेवाप्रवेश नियमांना बगल देऊन ठराविक प्रशासकीय विभागातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी संवर्गाच्या अधिकाऱ्यांना राज्यस्तरावर पदोन्नती देण्याचा अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय येथील तात्कालीन अधिकारी यांचा प्रयत्न आहे. असे मुंबई मॅटचे न्यायिक सदस्य मृदुला भाटकर व मेधा गाडगीळ यांच्यासमोर उघडकीस आले. त्यामुळे निरीक्षण अधिकारी गट-ब राजपत्रित संवर्गाची अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेली राज्यस्तरीय सेवाजेष्ठता यादी मॅटने रद्द ठरवली आहे.
दरम्यान, पुरवठा निरीक्षक संवर्गातून देण्यात आलेल्या पदोन्नती नियमबाह्य असल्याचा आरोप करत या पदोन्नती प्रकरणांची निवृत्त न्यायाधीश यांनी चौकशी करावी अशी मागणी पुरवठा निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षकांनी केली होती. अन्न व नागरी पुरवठा अधिकारी कर्मचारी संघाचा राज्यस्तरीय मेळावा औरंगाबादेत झाला होता. त्यावेळी ही मागणी करण्यात आली होती.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी गट-ब हे पद १९९८ च्या सेवाप्रवेश नियमानुसार महसुली विभाग स्तरीय आहे तसेच संबंधित महसूली विभागातील निरीक्षण अधिकारी यांना सेवाज्येष्ठतेनुसार सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी / सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी या पदावर संबंधित महसूल विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून पदोन्नती देण्यात यावी, असे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी / सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी सेवा प्रवेश नियम 1984 मध्ये प्रयोजन आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाने 2018 साली अन्न व नागरी पुरवठा विभागाला विद्यमान सेवाप्रवेश नियमानुसार पदोन्नतीची प्रक्रिया करण्याचे सुचवले होते, तरीही अन्न व नागरी पुरवठा विभागाने 2020 रोजी निरीक्षण अधिकारी गट-ब राजपत्रित संवर्गाची राज्यस्तरीय सेवा जेष्ठता प्रारूप यादी प्रसिद्ध केली.
मात्र सेवा जेष्ठता यादीने बाधित होत असल्याने दिनेश तावरे, प्रशांत खताळ व अंकुश कांबळे या पुणे विभागातील निरीक्षण अधिकाऱ्यांनी विहीत मुदतीत रीतसर पद्धतीने 9 फेब्रुवारी 2020 ला या यादीवर आक्षेप नोंदवला होता. परंतु अन्न व नागरी पुरवठा विभागाने वरील अधिकाऱ्याच्या आक्षेपाची दखल घेतली नव्हती. त्यामुळे मॅटमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.
त्याची चौकशी करून राज्य स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली निरीक्षण अधिकारी गट-ब राजपत्रित संवर्गाची सेवा जेष्ठता यादी कायद्याचे उल्लंघन करणारी व सरकारी लबाडी अधोरेखित करणारी आहे. अशा शब्दात मॅटने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. तसेच 1 मार्च 2022 व 3 मार्च 2022 रोजीच्या निकालपत्रात मॅट ने निरीक्षण अधिकारी गट व राजपत्रित संवर्गाच्या राज्यस्तरीय सेवाजेष्ठता याद्या रद्द केल्या आहेत. सोबतच आदर्श सेवाप्रवेश नियमानुसार व याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे निरीक्षण अधिकारी गट-ब राजपत्रित पदाच्या सेवाजेष्ठता याद्या संबंधित महसूली विभाग स्तरावर प्रसिद्ध करून सेवाज्येष्ठतेनुसार संबंधित विभागीय आयुक्तांनी महसूली विभाग स्तरावर सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी / सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी या पदावर पदोन्नती देण्याचे निर्देश मॅटने अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिले आहेत.