हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापुरात जाऊन राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करीत त्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रिफ व त्यांचे जावई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यास मुश्रीफांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने 1500 कोटींचा घोटाळा केला आहे, हा कोणता जावई शोध सोमय्यांनी लावला आहे,” असा सवाल मुश्रीफांनी केला.
“हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने 1500 कोटींचा घोटाळा केला आहे. ही कला पण वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असा आरोप किरीट सोमय्या यांनी आज केला. त्याबाबत मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. “सोमय्या तुम्हाला सूचना करतो की माझ्या जावयाचे आणि माझ्या कुटुंबीयाचे नाव सातत्याने घेत आहात. त्याचा कशाशीही संबंध नाही. आपला व्यवसाय करणाऱ्या एका माणसाचे नाव बदनाम करण्याचे काम करू नये. हे निषेधार्ह आहे”.
भ्रष्टाचारच करायचा असता, तर राज्य सरकारने स्वत:कडे पैसे घेऊन दिले असते. पण हे मार्गदर्शक पद्धतीचे काम होते. 10 मार्च 2021ला कंपनीला ऑर्डर दिल्यानंतर एकही ऑर्डर कंपनीला मिळालेली नाही. मग हा 1500 कोटींच्या घोटाळ्याचा कोणता जावईशोध सोमय्यांनी लावला? त्यामुळे किरीट सोमय्यांचा हा आरोप सुद्धा ओम फस्स झाला आहे”, असा शब्दात मुश्रीफांच्या सोमय्यांना प्रत्युत्तर दिले आहे.