मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सरकारला सूचना करतच असतात. राजकारणात नुकतेच पाऊल ठेवलेले त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मानधनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या डॉक्टर व नर्सेसच्या मानधनात कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेनं जोरदार आक्षेप घेतला आहे.
“कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्याकाळात ‘डॉक्टर हेच देव’ असल्याचा आपल्याला अनुभव येत आहे. विशेषत: राज्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे कितीही आभार मानले तरी ते अपुरेच ठरतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधनात कपात करणे कुठल्याही दृष्टीने पटणारे नाही” असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य सेवा आयुक्तलयानं २० एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधन ५५ हजार व ६० हजार असं निश्चित केलं आहे. त्यापूर्वी हे मानधन वेतन व भत्ते मिळून ७८ हजार इतके होते. मात्र, नव्या आदेशान्वये बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मानधन कंत्राटी सेवेच्या निकषावर निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांच्या मानधनात २० हजार रुपयांची कपात झाली आहे. बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर व परिचारिकांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक असल्याचं अमित ठाकरे यांनी पुढे पत्रात म्हटलं आहे.
सध्याच्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात डॉक्टर व परिचारिका अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. हरियाणासारख्या राज्यात करोनाच्या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून तितक्या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डॉक्टरांच्या वेतनात किंचितही कपात होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे, अशी अपेक्षा अमित यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या आराेग्य सेवकांच्याच( बंधपत्रित डॉक्टर्स,नर्सेस) मानधनात कपात? खरं तर सद्य परिस्थितीत त्यांच्या सेवेचं मोलच होऊ शकत नाही,त्यांच्या परिश्रमाच मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं,मानधन कमी करून नाही. श्री.अमित ठाकरे ह्यांच सरकारला आवाहन pic.twitter.com/piqcWBT0Xo
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 19, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”