हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दसरा मेळावा निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांकडूनही दसरा मेळावा आयोजित करण्यात आलाय. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच 2 मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवतीर्थीवर असून शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहेत. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष्य आहे. तत्पूर्वीच मनसेने उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत एका कार्टूनच्या माध्यमातून ठाकरेंवर निशाणा साधला आहे. साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील, ‘भिकार पी..जे बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब… बाप पळवणारी टोळी .. पाठीत खंजीर, कोथळा बॉम्ब असे या चित्रातून दाखवण्यात आले आहे. तसेच, हसरा मेळाव्याची तयारी, असा टोलाही गजानन काळे यांनी लगावला आहे.
टोमणे मेळाव्याचे भाषण तयार आहे …
हसा चकट फु … pic.twitter.com/aNLfDT4Oel— Gajanan Kale (@MeGajananKale) October 5, 2022
दरम्यान, आज दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आपले राजकीय वजन सिद्ध करण्यासाठी आणि शिवसैनिक आपल्याकडे आहेत हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न केला जात आहे. दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त गर्दी खेचून आपलीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शिंदे गट आणि ठाकरेंकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा दोघांसाठीही अत्यंत प्रतिष्ठेचा आहे.