हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यातील एकमेकांवर केल्या जात असलेल्या टिकेवरून वातावरण तापले आहे. ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंना प्रत्युत्तरही दिले. आता यानंतर मनसेकडून २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच आता शरद पवारांनीच माफी मागावी, अशी मागणीही पत्राद्वारे केली आहे.
मनसेच्या वतीने नुकतेच एका पत्र जाहीर करण्यात आले आहे. आणि त्या पत्रातून थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल करण्यात आलेला आहार. बाबासाहेबा पुरंदरेंनी १० नोव्हेंबर २००३ रोजी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला लिहिलेले एक पत्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समोर आणले आहे.
काय लिहिलंय पत्रात?
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सादर केलेल्या पत्रात म्हंटले आहे की, “ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचे प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केले आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेनने जे विधान केले आहे ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी २५ नोव्हेंबर २००३ पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावे. जर प्रकाशक आणि लेखकाने असे काही केले नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी”, असे या पत्रातून बाबासाहेब पुरंदरे आणि इतर इतिहासकारांनी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला सांगितले आहे.
शरद पवार काय म्हणाले?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी काल भूमिका मांडली आहे. यावेळी ते म्हणाले की, “जेम्स लेननं केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून बाबासाहेब पुरंदरेंकडून ही माहिती घेतली असे म्हंटले होते. एखाद्या लेखकाने गलिच्छ प्रकारचे लिखाण केले आणि त्याला माहिती देण्याचे काम पुरंदरेंनी केले. त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचं दु:ख वाटत नाही तर अभिमान वाट तो, असे पवार यांनी म्हंटले होते.